‘तरस’ ते ‘शॅम्पेन’… शर्वरीच्या प्रवासाचे कोरिओग्राफर विजय गांगुलींकडून कौतुक: “ती स्टेप्स अगदी बटरसारख्या सहज करत होती!”

0
1000671514

Mumbai :ऐल्फा चित्रपट थिएटरमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करत असताना, चित्रपटातील शॅम्पेन हे गाणे विशेष चर्चेचा विषय ठरले आहे. या गाण्यातील शर्वरीची अफाट ऊर्जा, सहजसुलभ डान्स मूव्ह्ज आणि दमदार स्क्रीन प्रेझेन्सला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळत आहे. विजय गांगुली यांनी कोरिओग्राफ केलेल्या या हाय-एनर्जी गाण्यात शर्वरी एका नव्या डान्स स्टाइलमध्ये दिसत असून, तिच्या मेहनतीबद्दल आणि समर्पणाबद्दल त्यांनी मनापासून कौतुक केले आहे.

याआधी तरस या लोकप्रिय गाण्यात  शर्वरीसोबत काम केलेल्या विजय गांगुली यांनी तिच्या कलाकार म्हणून झालेल्या प्रगतीबद्दल सांगितले. ते म्हणाले, “आम्ही तरस करत होतो तेव्हा  शर्वरीला रिहर्सलसाठी पुरेसा वेळ मिळाला नव्हता. तरीही तिने तिच्या एक्सप्रेशन्स, ग्रेस आणि डान्समुळे ते गाणं अप्रतिम केलं. मी खूप प्रभावित झालो होतो आणि पुन्हा तिच्यासोबत काम करण्याची इच्छा होती. त्यानंतर शॅम्पेन आलं.”

शॅम्पेन हे तरसपेक्षा पूर्णपणे वेगळं गाणं असल्याचं सांगत विजय म्हणाले, “तरस आणि शॅम्पेन यांच्यात खूप फरक होता. आदी सर आणि शिव यांना या गाण्यात एक जिवंत, स्ट्रीट आणि हिप-हॉप फील हवा होता. आम्ही  शर्वरीला भरपूर रिहर्सल करावी लागेल असं सांगितलं, पण तिने इतक्या पटकन सर्व स्टेप्स आत्मसात केल्या की शेवटी मला तिलाच सांगावं लागलं, ‘आता रिहर्सल थांबव, तू जास्तच रिहर्सल करते आहेस.’ प्रत्येक स्टेप आणि प्रत्येक एक्सप्रेशन परफेक्ट होईपर्यंत ती सातत्याने मेहनत घेत होती.”

शूटिंगदरम्यान  शर्वरीच्या तयारीमुळे संपूर्ण प्रक्रिया किती सुरळीत झाली, याबद्दल विजय म्हणाले, “जेव्हा आम्ही सेटवर पोहोचलो, तेव्हा असं वाटलंच नाही की आम्ही एखादं गाणं शूट करतोय. कॅमेरा सुरू होताच ती पूर्णपणे तयार होती. ती कोरिओग्राफी अगदी बटरसारखी सहज करत होती. एक अवघड लाँग-टेक सिक्वेन्सही आम्ही अपेक्षेपेक्षा खूप लवकर पूर्ण केला, कारण ती इतकी उत्तम तयारी करून आली होती. ती खूप उत्कृष्ट टेक्स देते.”

शर्वरीच्या प्रवासाचं कौतुक करत विजय शेवटी म्हणाले, “तरसपासून शॅम्पेनपर्यंत शर्वरीचा प्रवास पाहणं खूप छान वाटतं. कलाकार म्हणून ती खूप विकसित झाली आहे. या गाण्यासाठी तिने तिचं शंभर टक्के दिलं आहे—तिची ऊर्जा, अचूकता, लूक आणि परफॉर्मन्स सगळंच अप्रतिम आहे. प्रत्येक वेळी तिच्यासोबत काम करताना पहिल्याच दिवसासारखा उत्साह वाटतो. तिचं भविष्य निश्चितच खूप उज्ज्वल आहे.”

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *